कृष्णा नदीच्या काठावर चमत्कार, भगवान विष्णूची 1000 वर्षे जुनी 'रामलला' सारखी मूर्ती सापडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:14 PM2024-02-07T15:14:32+5:302024-02-07T15:16:31+5:30
सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे.
तेलंगणा-कर्नाटक सीमेजवळ कृष्णा नदीच्या काठावर शतकानुशतके जुनी विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. कर्नाटकातील रायचूर येथे पुलाच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती सापडली आहे. याठिकाणी सापडलेल्या मूर्ती 11 व्या किंवा 12 व्या शतकातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सापडलेली विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील राम मंदिरात प्रतिष्ठापणा केलेल्या रामललासारखी आहे. दशावताराच्या मूर्तीभोवती एक आभामंडळ आहे, ज्यावर भगवान विष्णूचे सर्व अवतार कोरलेले आहेत.
सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) ताब्यात घेतले आहे. मूर्ती आणि शिवलिंगाचे परीक्षण होणार आहे. मात्र, ही मूर्ती जवळपास एक हजार वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. रायचूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावी. याशिवाय, मंदिरावर हल्ला आणि तोडफोड केल्यानंतर भाविकांनी मूर्ती वाचवण्यासाठी तिला नदीत फेकले असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील रामललासारखी आहे. आभामंडळावर मत्स्य, कूर्म, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे भगवान विष्णूचे सुंदर 10 अवतार कोरलेले आहेत. तसेच, उभ्या असलेल्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुशोभित आहेत. दोन हात खाली तोंड करून आशीर्वाद मुद्रेत आहेत. या मूर्तीवर भगवान विष्णूचे वाहन गरुडाचे चित्रण नाही.
अयोध्येत अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड!
कर्नाटकातील म्हैसूर येथील रहिवासी शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी मूर्ती तयार केली होती. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी पाच वर्षांच्या रामललाची मूर्ती फायनल केली. त्यांच्या हातांनी बनवलेल्या मूर्तीची निवड श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने गर्भगृहात अभिषेक करण्यासाठी केली होती.