नवी दिल्ली - रशियाशी केलेल्या एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिमचा करारावरून अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हा करार रद्द न केल्यास कठोर पावले उचलण्याची धमकीही दिली होती. मात्र भारताने अमेरिकेच्या दबावासमोर न झुकता हा करार पूर्णत्वास नेला होता. आता या मुद्द्यावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक व्लादिमीर पुतीन हे सोमवारी भारताच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, त्यांनी २८ करारांवर सह्या केल्या.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सोमवारी सांगितले की, आमच्या भारतीय मित्रांनी स्पष्ट आणि दृढपणे भारत एक सार्वभौम देश आहे आणि कुणाकडून हत्यारे खरेदी करावीत हे आम्हीच ठरवू, असे ठणकावून सांगितले. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काल झालेल्या बैठकीमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादावरही चर्चा झाली. या बैठकीत अफगाणिस्तानच्या जमिनीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू न देण्याबाबतही चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमध्ये एकूण २८ करार झाले. त्यातील सहा दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये तर उर्वरित करार हे बिझनेस टू बिझनेस असे झाले. मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आळेल्या पत्रकात सांगण्यात आले की, बैठकी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. तसेच तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या रणनीतीवरही चर्चा झाली.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे सोमवारी भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २१ व्या भारत-रशिया वार्षिक संमेलनामध्ये सहभाग घेतला. मात्र जे व्लादिमीर पुतिन कधी पाकिस्तानला गेले नाहीत, गेल्या दोन वर्षांत जे पुतिन केवळ दुसऱ्यांदा आपल्या देशाबाहेर पडले. ते पुतिन केवळ ५ तासांच्या दौऱ्यासाठी भारतात का आले होते? पुतिन यांनी हजारो किलोमीटर लांबून येत केलेल्या अवघ्या ५ तासांच्या दौऱ्याने भारताला काय मिळाले, असा प्रश्न विचारला जात आहे.
भारत आणि रशियाच्या संबंधांची भक्कम पायाभरणी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. कारण हे संबंध महत्त्वाचे नसते तर पुतिन हे भारतात आले नसते. गेल्या दोन वर्षांत एक अपवाद वगळता कुठल्याही परदेश दौऱ्यावर गेले नव्हते. यावर्षी जिनेव्हामध्ये जो बायडन यांची भेट घेतली होती. मात्र पुतिन यांनी त्यांचा चीनचा मोठा दौराही टाळला होता.
या भेटीआधी मोदी आणि पुतिन यांची भेट दोन वर्षांपूर्वी ब्राझिलियामधील ब्रिक्स संमेलनात झाली होती. त्यानंतर कोरोनाकाळात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मात्र दोन्ही नेते फोनवरून सहा वेळा एकमेकांशी बोलले होते. तसेच तीन वेळा व्हर्च्युअल मिटिंगही झाली होती. विश्वासाच्या याच मॉडेलला पंतप्रधान मोदींनी मैत्रीचे सर्वात विश्वसनीय मॉडेल म्हटले आहे.