अधिकाऱ्याने दाबले चुकीचे बटन, 140 मते डिलीट, पुन्हा होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:38 PM2019-04-23T19:38:42+5:302019-04-23T20:06:07+5:30
निवडणूक आयोगाने आग्रा मतदान केंद्र क्रमांक 455 वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आग्रा : निवडणूक आयोगाने आग्रामतदान केंद्र क्रमांक 455 वर दुसऱ्यांदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याकडून चुकीचे बटन दाबले गेल्याने 140 मतं डिलीट झाली. यामुळे निवडणूक आयोगाने 25 एप्रिलला पुन्हा मतदान घेण्याची तयारी दर्शविली आहे.
आग्रा लोकसभा मतदार संघासाठी गेल्या 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. यावेळी मतदान केंद्र 455 वर तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने आता पुन्हा याठिकाणी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांकडून सुद्धा याठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात येत होती.
लोकसभा निवडणुकीसाठी 18 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील नगीना, अमरोहा, बुलंदशहर, अलीगड, मथुरा, हाथरस, आग्रा आणि फतेहपूर सीकरी या मतदार संघात मतदान झाले होते. मथुरा मतदारसंघातून अभिनेत्री हेमा मालिनी, फतेहपूर सीकरीमधून काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, आग्रामधून ए.सी बघेल आणि अमरोहा मतदार संघातून बसपा उमेदवार दानिश अली निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, मतदानाच्या तिस-या टप्प्यात आज देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे.