छत्तीसगडमध्ये आज मतदान!; जोगींच्या पक्षात गुन्हे असलेले सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 05:48 AM2018-11-20T05:48:43+5:302018-11-20T06:36:41+5:30
छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली. तेथील उरलेल्या ७२ मतदारसंघांमध्ये उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे.
- योगेश पांडे
रायपूर : छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी संपली. तेथील उरलेल्या ७२ मतदारसंघांमध्ये उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. एकूण १९ जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ असून, मतदानाच्या काळात गडबड होऊ नये, यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी एक लाखांहून अधिक पोलीस व राखीव पोलीस तिथे आणण्यात आले आहेत. गरियाबंद, धमतरी, महासमुंद, कबीरधाम, जसपूर आणि बलरामपूर या भागांत नक्षलवाद्यांचा उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊ न त्या जिल्ह्यांमध्ये अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये यंदा बहुतांश पक्षांनी तरुण उमेदवारांवर जास्त विश्वास दाखविला आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाºया निवडणुकीत थोडेथोडके नव्हे तर ४२ टक्के उमेदवार हे चाळिशीच्या आतील आहेत. त्यापैकी ११ टक्के उमेदवार २५ ते ३० याच वयोगटातील आहेत. ‘एडीआर’च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
छत्तीसगडमधील दुसºया टप्प्याच्या निवडणुकांतील ७२ जागांवर एकूण १ हजार ७९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील १ हजार ६९ उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ४२.४० टक्के उमेदवार हे २५ ते ४० या वयोगटातील आहेत, तर ५१५ उमेदवार हे ४१ ते ६० या वयाचे आहेत. केवळ एक उमेदवार ८० हून अधिक वयाचा आहे. यंदा ११.७२ म्हणजेच १२५ उमेदवार तिशीच्या आतील आहेत.
भाजपामध्ये श्रीमंत अधिक
पहिल्या टप्प्यातील मतदानात भाजपा व काँग्रेसमध्ये सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार होते. दुसºया टप्प्यात भाजपामध्ये सर्वाधिक ८४.७२ टक्के (६१ उमेदवार) कोट्यधीश आहेत. तर काँग्रेसमधील ७३.६१ टक्के (५३ उमेदवार) कोट्यधीश आहेत. ‘आप’मध्ये १९.४० टक्के (१३) उमेदवारांची संपत्ती एक कोटीहून अधिक असून, ९.१५ टक्के अपक्षांनी एक कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या एका उमेदवाराची संपत्ती तब्बल ४९१ कोटींहून अधिक आहे. रायपूरमधील एका अपक्ष महिला उमेदवाराची संपत्ती अवघी १०४ रुपये इतकी आहे.
२२ टक्के उमेदवार कोट्यधीश
निवडणुकीच्या रिंगणातील एकूण २२ टक्के (२४३) उमेदवार कोट्यधीश आहेत. यातील ६.५५ टक्के उमेदवारांची संपत्ती पाच कोटी किंवा त्याहून अधिक आहे, तर ७.३९ टक्के उमेदवारांची संपत्ती २ ते ५ कोटींच्या आसपास आहे. ४२.१० टक्के (४५०) उमेदवारांची संपत्ती १० लाखांहून कमी आहे.
गंभीर गुन्हे असलेले उमेदवार
दुस-या टप्प्यात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. एकूण ८.४४ टक्के (९० जण) उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात हत्येचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात हिंसाचार यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या छत्तीसगड जनता काँग्रेसच्या ३०.४३ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या १५.२८ टक्के तर भाजपच्या
७ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत.
३६ टक्के पदवीधर : दुस-या टप्प्यात बहुतांशी शहरी भागांत निवडणुका होणार असल्या तरी केवळ ३६.७७ टक्के उमेदवारच पदवीधर असून, ५६.७५ टक्के उमेदवार बारावीपर्यंत शिकलेले आहेत आणि ३.३८ टक्के उमेदवार केवळ साक्षर आहेत. दुस-या टप्प्यातील नऊ
उमेदवार निरक्षर आहेत.