दारू बाटल्यांवर मतदानाचा संदेश, टीका झाल्यावर निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 04:21 AM2018-10-22T04:21:00+5:302018-10-22T04:21:14+5:30
नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला.
झाबुआ : नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला. मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत. त्यामुळे तळागाळातील नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दारू विक्रेत्यांना स्टिकर्स वितरित केले. त्यातील काहींनी ते स्टिकर्स दारूच्या बाटल्यांवर लावून त्यांची विक्रीही केली. न चुकता मतदान करण्याचा संदेश या बाटल्यांवर देण्यात आला होता. या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे स्टिकर्स दारू विक्रेत्यांकडून परत मागवले आहेत, असे उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे २०१६ मध्ये बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यानंतर असाच निर्णय मध्यप्रदेशातही घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तेव्हा जाहीर केला होता. नर्मदा नदीच्या काठावर पाच किलोमीटर अंतरातील दारूची अनेक दुकाने बंदही करण्यात आली होती. नर्मदा सेवा यात्रेच्या काळात त्यांनी निवडणुकांवर डोळा ठेवून राज्यात संपूर्ण दारूबंदीचे आश्वासनही दिले होते. असे असताना दारूच्या बाटल्यांवरच मतदान करण्याचा संदेश देणारे स्टिकर्स चिकटवण्याचा निर्णय घेण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तथापि, राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करणार नाही, असे राज्याच्या वित्तमंत्र्यांनी नंतर जाहीर केले होते. असे केले तर राज्यातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावतील, असा युक्तिवादही त्यांनी केला होता.