हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत कोणतीही तडजोड नको, असे काँग्रेस पक्षाला वाटत आहे. तथापि, काँग्रेस नेतृत्वाचे असे मत आहे की, २०२४ ची निवडणूक इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष तृणमूल काँग्रेससोबत लढवावी.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससाठी लोकसभेच्या चार जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांची अट एवढीच आहे की, पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांशी काँग्रेसचा काहीही संबंध राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये ४२ पैकी ६ जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. २०१९ च्या निवडणुकीत ५.६७ टक्के मते घेऊन काँग्रेसने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या होत्या. तर, सीपीएमला ६.३४ टक्के मते मिळाली होती. मध्यस्थांमार्फत चर्चा अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. तथापि, तृणमूलला इतर राज्यांमध्ये दोन जागा हव्या आहेत. काँग्रेसने असा प्रस्ताव फेटाळलेला नाही.
आघाडी करण्यात समजूतदारपणाराजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा काँग्रेस-सीपीएमसोबतचा अनुभव मतदारांना चांगला वाटला नाही. सीपीएमची व्होट बँक काँग्रेसकडे न जाता भाजपच्या बाजूने जाण्याचा अनुभव आला. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या मतदारांनी टीएमसी किंवा भाजप यापैकी एकाचा पर्याय निवडला. त्यामुळे एकट्याने किंवा डाव्यांसोबत जाण्यापेक्षा टीएमसीसोबत औपचारिक आघाडी करणेच समजूतदारपणाचे ठरेल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.