देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशामध्ये गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले असून, इतकी विक्रमी वाढ प्रथमच झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तसेच गुरुवारी २० हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून तेदेखील आजवरचे सर्वांत जास्त प्रमाण आहे.
कोरोनामुळे गुरुवारी आणखी ६०६ लोक मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या २४, ९१५ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात कोरोनाचे ३२,६९५ नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाच्या आजारातून ६,१२,८१४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सध्या ३,३१,१४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात दिवसेंदिवस अनेक लोक कोरोनावर मात करत आहेत. कोरोनावर यशस्वी झालेल्या रुग्णांचे ठिकठिकाणी टाळ्या, पुष्पगुष्छ देऊन स्वागत घरी, सोसायटी याठिकाणी स्वागत केले जात आहे. मात्र कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशननूसार, जर तुमचा एखादा नातेवाईक किंवा मित्राने कोरोनावर मात केली असेल. त्यानंतर तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीला भेटायचे असेल तर पुढील तीन गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीला कमीत कमी ३ दिवसांपासून ताप येत तर नाही ना याची विचारपूस करा. तसेच दूसरी गोष्ट म्हणजे संबंधित व्यक्तीला खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास आता होत नाही ना, याची खातरजमा करा. त्याचप्रमाणे रुग्णालयातून घरी परतल्यानंतर संबंधित व्यक्ती १० दिवस होम क्वारंटाईन राहिल्यानंतरच त्या व्यक्तीची भेट घ्या, या सर्व अटींचे पालन केल्यानंतर कोणतीच समस्या उद्भवणार नाही.