दिल्लीतील यमुना नदीची जलपातळी पुन्हा वाढली; अनेक सखल भागात पुराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:04 AM2023-07-23T11:04:15+5:302023-07-23T11:04:22+5:30
संध्याकाळपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: दिल्लीतील यमुना नदी पुन्हा धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. आज (रविवार) सकाळी ६ वाजता यमुनेच्या पाण्याची पातळी २०५.७५ मीटर नोंदवण्यात आली. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिल्लीतील सखल भागात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज २३ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी २०६.७ मीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हथिनीकुंड धरणमधून पाणी सोडण्यात आल्याने यमुनेमध्ये पुन्हा उधाण आले आहे. हरयाणातील हथिनीकुंड धरणाची पातळी वाढली गेल्या २४ तासांत पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांत झालेल्या पावसामुळे हथिनीकुंड धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धरणाच्या पाण्याचा प्रवाह अडिच लाख क्युसेकवर पोहोचला. संध्याकाळपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
#WATCH | Water level of river Yamuna in Delhi increasing again, water level recorded at 205.75 m
— ANI (@ANI) July 23, 2023
Visuals from Old Yamuna Bridge (Loha Pul) pic.twitter.com/sHD5nWbk3w
उत्तर भारतात मुसळधार पावसाने पुन्हा थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलाच्या एका गावात शनिवारी सकाळी लैला नदीला अचानक आलेल्या पुरात ढाबा वाहून गेल्याने एक वृद्ध जोडपे आणि त्यांचा नातू मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे, तर जम्मू-श्रीनगर महामार्गावर दोन ठिकाणी भूस्खलन झाले आहे. राज्यातील ६५६ रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. १६७३ ट्रान्स्फाॅर्मर खराब झाले आहेत. शिमलाजवळ काही ठिकाणी रस्त्यांना तडा गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मनालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली.
त्तर प्रदेशात नदीच्या प्रवाहात बस अडकली, ४० प्रवाशांची सुटका
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर असलेल्या बिजनौर जिल्ह्यातील मंडावली भागात कोटावली नदीच्या प्रवाहात राज्य परिवहन महामंडळाची बस अडकली. यातील ४० प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. ही बस ४० प्रवाशांसह हरिद्वारला जात होती. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
अतिवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मेहर आणि दलवास भागात भूस्खलन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ढिगारा हटवल्यानंतर महामार्गावर वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. डोडाजवळ ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यादरम्यान ३४७२ यात्रेकरूंची २०वी तुकडी जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्प येथून १३२ वाहनांनी शनिवारी पहाटे काश्मीरला रवाना झाली.