नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. माजी कॅबिनेट मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांनी ईडीने जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत मोठी माहिती दिली आहे. ईडीने जप्त केलेले पैसे आपले नाहीत, असे पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचा हवाला दिला आहे.
"जप्त करण्यात आलेले पैसे माझे नाहीत. मी आजारी आहे. या पैशाशी माझा काहीही संबंध नाही", असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पार्थ चॅटर्जी म्हणाले. याशिवाय, पार्थ चॅटर्जी यांना ईएसआय रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पार्थ चॅटर्जी म्हणाले, "माझ्याविरोधात कोणी कट रचला, वेळ आल्यावर सर्व काही समजेल."
याआधी पार्थ चॅटर्जी यांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, पक्षातील वरिष्ठ नेतृत्वासह सर्वांनाच शाळेतील शिक्षक म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी अपात्र उमेदवारांकडून जमा केलेल्या पैशाची माहिती होती. एका तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पार्थ चॅटर्जी यांनी मंत्रिपद गमावल्यानंतर आणि पक्षातून निलंबित झाल्यानंतर बोलणे सुरू केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, ते फक्त एक कवस्टोडियन होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
याचबरोबर, पार्थ चॅटर्जी यांनी दावा केला की त्यांनी कधीही उमेदवारांकडून पैसे मागितले नाहीत किंवा स्वीकारले नाहीत. पक्षाचा हुकूम होता आणि तो आदेश पाळत होतो. इतरांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर त्याला स्वाक्षरी करायची होती. इतरांनीही पैसे गोळा करून त्याच्याकडे पाठवले. पैसे सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. नंतर शेकडो कोटी रुपये पक्षाच्या वापरासाठी घेतले गेले. या रकमेपैकी केवळ एक अंश जप्त करण्यात आले आहेत. याचा खुलासा त्यांनी आतापर्यंत केला आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
ममता सरकारकडून पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई!पार्थ चॅटर्जी हे दोन दशकांहून अधिक काळ आमदार आहेत. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला ममता बॅनर्जींना मार्गदर्शन करणाऱ्या तृणमूल काँग्रेस नेत्यांपैकी ते एक होते असाही काहींचा दावा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ममता सरकारने पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. ज्यावेळी ते शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.