नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा जावेदने या संदेशात म्हटलं आहे की, आई मेहबूबा यांना अटक केल्यानंतर काही दिवसांत आम्हाला घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
इल्तिजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. त्या मीडियाशी बोलण्यावरुन धमकविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. इल्तिजाने सांगितले की, अनेक काश्मिरींना जनावरासारखं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हे मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. मी जर मीडियाशी बोलली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरेन्सचे उमर अब्दुला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 4 ऑगस्टला रात्री उशीरा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
गेल्या सोमवारी (5 ऑगस्टला) मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरची पुनर्रचना केली. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळं करण्यात आलं आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. लडाखच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून लडाख हा केंद्रशासित प्रदेश व्हावा, अशी मागणी केली होती. जेणेकरून इथे राहणाऱ्या लोकांना स्वतःचे उद्देश पूर्ण करता येतील. तर जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा राहणार आहे.
तर भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप सुद्धा पी. चिदंबरम यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतू, भारतातील प्रसारमाध्यमे जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. भाजपा असा दावा करत आहे की, काश्मीरमधील परिस्थिती निवळली आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमधील अस्थिरतेचे वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला होता.