नवी दिल्ली: दलित व आदिवासी अत्याचारविरोधी (अॅट्रॉसिटी) कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सरकारची भूमिका मांडली. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच चालत आहोत. शांती आणि ऐक्य हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा होता. याबरोबरच आम्ही समाजातील गरीबात गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले. यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. भारतीय राज्यघटनेचे जनक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या सरकारशिवाय इतर कोणीही यथोचित सन्मान केला नाही, असेही त्यांनी म्हटले.अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात 10 जण ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अॅट्रॉसिटीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने येत्या 10 दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. जेव्हा केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांसंदर्भात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली तेव्हा काँग्रेस आणि विरोधकांनी भारत बंद आंदोलन का पुकारले? या आंदोलनामुळे 10 जणांचा बळी गेला. भाजपा आरक्षण रद्द करणार नाही आणि कोणालाही करूही देणार नाही, असे अमित शहा यांनी सांगितले.
आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालतोय- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 3:24 PM