आपण सर्वच तोडू शकतो कोरोना संसर्गाची साखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 06:18 AM2020-07-26T06:18:15+5:302020-07-26T06:18:25+5:30
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची विशेष मुलाखत
एस. के. गुप्ता।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आपण सगळे मिळून कोरोनाची साखळी तोडू शकतो. त्यासाठी आपल्याला पूर्णत: मास्क, फेस कव्हर अथवा रुमालांचा वापर करावा लागेल. घराबाहेर पडताना हे विसरू नका. डिस्टन्सिंगचे पालन करा. याद्वारेच या महामारीवर विजय प्राप्त केला जाऊ शकतो, असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोनाशी संबंधित अनेक बाबींचा ऊहापोह केला.
कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला असला तरी नवे कंटेन्मेंट झोनही सातत्याने वाढत आहेत. अधिक माहिती देताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त उपायांमुळे रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे. आतापर्यंत ८ लाख १८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोना लसीबाबत कधी १५ आॅगस्ट, तर कधी डिसेंबर २0२0 च्या तारखा सांगितल्या जात आहेत. नेमका किती काळ लागेल, याबाबत ते म्हणाले की, अनेक देश लस वा औषध बनविण्याच्या कामाला लागले आहेत. भारतातील दोन कंपन्या नैदानिक परीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात आहेत. चीनची एक कंपनी अंतिम अनुमतीजवळ पोहोचली आहे. ब्रिटनची एक कंपनी तिसऱ्या टप्प्यात आहे. अमेरिकेची एक कंपनी दुसºया टप्प्यात आहे. जगात एकूण २३ उमेदवार नैदानिक टप्प्यात आहेत. १४0 उमेदवार पूर्व नैदानिक स्थितीत आहेत.
उपचार व टेस्टिंगसाठी लाखोंची बिले दिली जात आहेत, यावर आरोग्यमंत्री म्हणाले की, सुरुवातीला खाजगी केंद्रांवर अधिक तपासणी शुल्क आकारले गेले. याबाबत राज्य सरकारांना चौकशीचे आदेश देण्यात आले. केंद्राने कोरोना योद्ध्यांसाठी ५0 लाखांची तरतूद केली आहे. अध्यादेश जारी करून डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाºयांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद केली आहे.
त्यांनी माहिती दिली की, देशात १२८४ प्रयोगशाळा आहेत. भारतात आधी पीपीई कीट व एन-९५ मास्क आयात केले जात. परंतु आज पीपीई कीट व मास्क बनवण्यातही आम्ही आत्मनिर्भर आहोत. चाचणीसाठीच्या १२८४ पैकी ३८९ प्रयोगशाळा खासगी क्षेत्रातील आहेत. सरकारी प्रयोगशाळांत मोफत तपासणी केली जाते. खाजगीमध्ये किती शुल्क घ्यावे याचे नियम निश्चित केले आहेत. आमच्या मंत्रालयाने सुरू केलेल्या १०७५ व ९१-११-२३९७९०४६ या हेल्पलाईनवर प्रत्येक कॉल ऐकला जातो. सर्वसामान्यांचे जनजीवन कधी रुळावर येईल याबाबत काही अंदाज व्यक्त करता येईल का, याबाबत ते म्हणाले की, लॉकडाऊन १.० पासून ४.० दरम्यान जनहितार्थ निर्बंध लावण्यात आले होते. आता अनलॉक १.० व २.० मध्ये फारच कमी निर्बंध बाकी आहेत. हळूहळू तेही हटवण्यात येतील.
सामूहिक प्रयत्नांतून धारावीत यश
जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलची प्रशंसा केलेली आहे. याबाबत ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक आंतरराष्टÑीय संघटनांनी केवळ धारावी मॉडेलच नव्हे, तर आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
आशियातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत नियंत्रण मिळवणे एवढे सोपे नव्हते; परंतु सामूदायिक किचन, तयार जेवण, साफसफाई, किराणासह सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा, ट्रेस-टेस्ट-ट्रीट हे सूत्र व केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार सरकार, स्वयंसेवी संस्था, निर्वाचित लोकप्रतिनिधी व स्थानिक निवासींमधील ताळमेळ यामुळे हे शक्य झाले.