महेश खरे सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल दुपारपर्यंत लागण्याची अपेक्षा असून काँग्रेस आणि त्याचे सहयोगी हार्दिक पटेल इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपेटच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न विचारत आहेत. ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नसल्याचे काँग्रेस व पटेल यांनी म्हटले.सूरतच्या कामरेज विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक जरिवाला यांनी स्ट्राँग रुमच्या परिसरात नमो अॅपच्या माध्यमातून ईव्हीएमची हॅकिंग केली जात असल्याचा आरोप केला. जरिवाला यांनी हा आरोप निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केला आहे. सूरतच्या एसव्हीएनआयटी व गांधी इंजिनियरिंग महाविद्यालय परिसरात (येथे ईव्हीएम ठेवल्या गेल्या आहेत) नमो अॅप चालू आहे. त्यांनी नमो अॅपच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक केले जाण्याची शंका व्यक्त केली. निवडणूक आयोगाने लगेचच जिल्हा निवडणूक अधिकाºयांना आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश दिले. जरिवाला यांचा आरोप असा आहे की बंद केल्यानंतरही नमो अॅप सुरू असल्याचे मला आढळले.पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपने पाच हजार ईव्हीएमच्या हॅकिंगसाठी एका कंपनीचे १४० सॉफ्टवेअर इंजिनियर कामाला लावल्याचा आरोप केला. भाजपला आपण पाटीदारांची बहुसंख्या असलेल्या भागात पराभूत होऊ, असे लक्षात आले असल्यामुळे त्याने ईव्हीएममध्ये हस्तक्षेप किंवा गडबड करण्याची निश्चित योजना तयार केली आहे. ईव्हीएममध्ये गडबड झाली नाही तर काँग्रेसचा विजय होणार, असे पटेल म्हणाले. काँग्रेसने म्हटले आहे की आम्हाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपेटवर विश्वास नाही.
ईव्हीएम व व्हीव्हीपेटवर आमचा विश्वास नाही - काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:56 AM