नवी दिल्ली - उस्मानाबादलोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत तडाखेबंद मराठी भाषण केले. अर्थसंकल्पावरील अभिनंदन भाषणात बोलताना ओमराजे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची आठवण करुन देत मराठवाड्यासाठी पाण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी औसा येथील मतदारसंघात निवडणूक प्रचारावेळी जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केल्याचे निंबाळकर यांनी म्हटले.
लोकसभा सभागृहात चक्क मराठीतून जोरदार भाषण करताना, आम्हाला कुठलंही पॅकेज नको, आम्हाला कुठलिही आर्थिक मदत नको. आम्हाला कर्जमुक्तीही नको. पण, माझ्या मराठवाड्याला आमच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी द्या, अशी मागणी ओमराजे यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला न देऊन आमच्यावर अन्याय केल्याचा आरोपही ओमराजे यांनी केला. ओमराजे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची उदाहरणंही दिली. मतदारसंघातील एका मुलीनं वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आत्महत्या केली. एका विद्यार्थ्यानं 94 टक्के गुण घेऊनही शिक्षणाचा खर्च शक्य नसल्याने आत्महत्या केल्याचं ओमराजे यांनी सांगितलं. केवळ, पाणी नसल्यानं शेती पिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मतदारसंघातील नागरिकांवर ही टोकाची भूमिका घेण्याची वेळ येत असल्याचंही ओमराजे यांनी म्हटलंय.
साहेब, मी सकाळपासून जेवणही केलं नाही. मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेऊन 1 लाख 28 हजार मतांनी विजयी करुन लोकांनी मला या सभागृहात पाठवलंय. कारण, मोदींनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा या लोकांना आहे. त्यामुळे, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याची दखल घेत, आमच्या मराठवाड्याला हक्काचं पाणी द्याव. अर्थसंकल्पात आमच्या पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी ओमराजे यांनी केली.
पाहा व्हिडीओ -