'सजविली होती मैफिल आम्ही, लुटून नेली दुसऱ्याच कुणी'; राम मंदिरावरून अखिलेश यांचा योगींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 04:17 PM2024-02-10T16:17:46+5:302024-02-10T16:21:14+5:30
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज युपीच्या विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोपरखळ्या मारल्या. राम मंदिराचा पूर्ण कार्यक्रम मोदींवर फोकस करण्यावर देखील टोले लगावले.
उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरामुळे भक्तीची लाट आहे. याचा फायतदा भाजपा पुरेपूर उचलणार आहे. असे असताना ज्या सपा सरकारच्या काळात बाबरी मशीद पाडली गेली तो पक्षही संधी शोधत आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज युपीच्या विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोपरखळ्या मारल्या. राम मंदिराचा पूर्ण कार्यक्रम मोदींवर फोकस करण्यावर देखील टोले लगावले.
उत्तर प्रदेशमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये अखिलेश यादव यांनी गेल्यावेळी जेवढा निधी विभागांना दिला होता त्यापैकी निम्माही खर्च करण्यात आला नसल्याची टीका केली. सरकार ९० टक्के लोकांसाठी १० टक्के निधी देत आहे. तर १० टक्के लोकांसाठी ९० टक्के निधी दिला जात आहे. या बजेटमुळे मग कशी काय महागाईवर मात होईल, कसा रोजगार निर्माण केला जाईल, असा सवाल अखिलेश यांना लगावला.
यावेळी अखिलेश यांनी राम मंदिर आणि मोदींवरून योगींवर जोरदार टोला लगावला. अयोध्येला कितीदा गेले ते माहिती नाही, रस्ते कसे बनणार, लाईट कशी लागणार? सगळे पाहिले. पण ऐन कार्यक्रमाच्या दिवशीच दिसले नाहीत, असे म्हणत अखिलेश यांनी 'हुजूरे आला आज तक खामोश बैठे हैं इसी गम में। सजाई थी हमने, महफिल लूट ले गया कोई' काव्य पंक्तीमध्ये योगी यांना टोला लगावला.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा विरोधकांचा नाही. दिल्लीपासून लखनौपर्यंत डबल इंजिन सरकारचा हा नारा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे? कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार की नाही? चांगली औषधे आणि चांगल्या शिक्षणासाठी बजेटमध्ये किती तरतूद आहे? हे स्पष्ट करावे असेही अखिलेश म्हणाले.