अमेठी: राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र आम्ही मेड इन अमेठीचं स्वप्न साकार केलं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. मोदींनी आज अमेठीत अत्याधुनिक क्लाशनिकोव-203 रायफल्सच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑर्डनान्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधींनी 1500 जणांना कारखान्यात रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली. त्यांनी केवळ 200 लोकांना रोजगार दिला. तरुणांचा विश्वासघात करणारे जगात रोजगारावर भाषणं देत फिरत आहेत, अशी टीका मोदींनी केली. 'या ठिकाणी 8-9 वर्षांपूर्वीच काम सुरू व्हायला हवं होतं. कोरबातील या कारखान्याची सुरुवात अत्याधुनिक रायफल्सच्या निर्मितीसाठीच झाली होती. मात्र या कारखान्याचा पूर्ण वापर करण्यात आला नाही. भूमिपूजन झाल्यानंतरची 3 वर्षे या ठिकाणी कोणत्या रायफल्स तयार करायच्या या चर्चेमध्येच गेली. साधी इमारतदेखील उभारली गेली नाही. 2010 मध्ये काम सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र 2013 पर्यंत काम सुरूच झालं नाही. इमारत तयार झाल्यावर बराच काळ रायफल्सची निर्मितीच झाली नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या संथ कारभारावर टीका केली. अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती न झाल्यानं आपल्या वीर जवानांवर अन्याय झाला की नाही, असा सवाल मोदींनी उपस्थित असलेल्या जनतेला विचारला. 'इथल्या संसाधनांवर अन्याय झाला की नाही? रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांवर अन्याय झाला की नाही?,' असे प्रश्न मोदींनी अमेठीतील जनतेला विचारले. '2014 मध्ये आम्ही सबका साथ-सबका विकासची घोषणा दिली होती. अमेठी याचं उदाहरण आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलं, ते आमचे आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही, तेदेखील आमचेच. ज्या मतदारसंघात विजयी झालो, तो आमचा आणि पराभूत झालो, तोदेखील आमचाच,' असं मोदी म्हणाले.