अलिगड - काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे धक्कादायक वक्तव्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे. खुर्शीद यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या केलेल्या दौऱ्यादरम्यान बाबरी मशीद विध्वंस आणि जातीय दंगली संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसच्या हातांवरही मुस्लिमांच्या रक्ताचे डाग लागलेले असल्याचे मान्य केले.
अलिगड मुस्लिम विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात खुर्शीद यांच्यासमोर अबीर मिंटोई या विद्यार्थ्याने काँग्रेसच्या काळात मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या कार्यकाळात एएमयूच्या कायद्यात बदल झाला. हाशिमपूर आणि मुझफ्फरनगर येथे दंगली झाल्या. बाबरी मशिदीचे दरवाजे उघडले गेले, त्यात मूर्ती ठेवली गेली, हे सर्व काँग्रेसच्या काळात झाले. काँग्रेसच्या हातांना हे जे मुस्लिमांचे रक्त लागले आहे, त्यावर तुमचे काय मत आहे. ते काँग्रेस कसे काय धुवून काढणार असा सवाल या विद्यार्थ्याने केला. त्यावर खुर्शीद म्हणाले, आमचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळेच तुम्ही आम्हाला आज हा प्रश्न विचारताय. जर कुणी तुमच्यावर वार केला तर पुढे होऊन त्याला रोखायला नको का? हे डाग आमच्यावर लागले आहेत ते तुमच्यावर लागता कामा नयेत हे समजून घ्या. जर तुम्ही त्यांच्यावर वार केले तर त्याचे डाग तुम्हाला लागतील. तेव्हा आमच्या या इतिहासातून बोध घ्या. स्वत:ची अशी अवस्था करून घेऊ नका. जेणेकरून दहा वर्षांनंतर तुम्ही जेव्हा विद्यापीठात याल, तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत.