नवी दिल्ली: अविश्वास ठराव आणि राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकजूट दिसली, असा उपरोधिक टोला भाजपा अध्यक्ष अमित शहांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये एच. डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेते एकाच मंचावर दिसल्यानं विरोधकांच्या एकीची चर्चा सुरू झाली होती. यानंतर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव आणि राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. यावर भाष्य करताना शहांनी विरोधकांना चिमटा दाखवला. यासोबतच देशात मुदतीआधी सार्वत्रिक निवडणूक होणार नाहीत, असंही ते म्हणाले. पुढील काही महिन्यात छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही राज्यात भाजपा सत्ता राखेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. ते 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते. आम्ही तिन्ही राज्यातील निवडणुका जिंकू असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. देशात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. सत्तेत आल्यापासून केलेल्या लोकोपयोगी कामांच्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत जाऊ, असं अमित शहा म्हणाले. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, असं देशातील जनतेला वाटतं, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरही थोडक्यात भाष्य केलं. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणात सरकारची बाजू स्पष्ट केली आहे, असं शहांनी सांगितलं. ज्या लोकांकडे सध्या काही रोजगार उरलेला नाही, त्यांच्याकडे टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:12 PM