West bengal Assembly Election : ममता बॅनर्जींवर २४ तासांची प्रचारबंदी, १७ एप्रिलला पाचव्या टप्प्यातील मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:12 AM2021-04-13T05:12:01+5:302021-04-13T07:12:43+5:30
West bengal Assembly Election : ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला धाेका निर्माण हाेईल, असे वक्तव्य केल्याचे आयाेगाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयाेगाने २४ तासांसाठी निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घातली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयाेगाने ही कारवाई केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला धाेका निर्माण हाेईल, असे वक्तव्य केल्याचे आयाेगाने म्हटले आहे. आयाेगाच्या निर्णयानुसार त्यांना १३ एप्रिलला रात्री ८ वाजेपर्यंत प्रचार करता येणार नाही. पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला पाचव्या टप्प्याचे मतदान हाेणार आहे. त्यासाठी प्रचार १४ तारखेलाच संपणार
आहे. दरम्यान, निवडणूक आयाेगाने केलेल्या कारवाईचा ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला आहे. कारवाईच्या निषेधार्थ त्या मंगळवारी काेलकाता येथे गांधी मूर्ती येथे धरणे दुपारी १२ वाजता धरणे आंदाेलन करणार आहेत.
‘पराभव दिसत असल्याने ममतांचा क्रोध वाढला’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चार टप्प्यांच्या मतदानानंतर तृणमूलला त्यांचा पराभव होत असल्याचे कळले आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानात जनतेने इतके चौकार-षटकार लगावले आहेत की, भाजपच्या जागांचे शतक झाले आहे. तर नंदीग्रामच्या लोकांनी ममतांना आऊट केले आहे, या शब्दांत मोदी यांनी ममतांवर टीका केली.
- मां, माटी आणि मानुषचे आश्वासन देत ममता बॅनर्जी १० वर्षांअगोदर सत्तेत आल्या होत्या. मात्र, त्यांनी महिलांना त्रास देणे, मातीला लुटणे आणि मनुष्यांचा रक्तपात हा मार्ग निवडला.
- तोडा फोडा व राज्य करा हीच त्यांची भूमिका राहिली. निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने त्यांचा क्रोध व अस्वस्थता वाढत आहे. भाचा अभिषेक बॅनर्जीला पक्षाची धुरा देण्याचा त्यांचा मानस धुळीला मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये एकदा जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो तो परत येत नाही, हा येथील इतिहास राहिला आहे. ममता एकदा पराभूत झाल्या की परत कधी येऊ शकणार नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला.