पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर (West Bengal Assembly Election) बंगालमध्ये भाजपाला सातत्यानं एकामागोमाग एक झटके बसताना दिसून येत आहेत. आता उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज येथील भाजपाचे आमदार कृष्णा कल्याणी (Krishna Kalyani) यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बंगालमधील मेनेटर हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी आणि आमदार विवेक गुप्ता यांच्या उपस्थितीत कृष्णा कल्याणी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. कल्याणी यांनी याच माहिन्याच्या सुरुवातीला भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
भाजपातील पदांचा राजीनामा दिल्यानंतर कल्याणी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता याआधीच वर्तविण्यात आली होती. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झालं आहे. कल्याणी यांना भाजपा प्रदेश कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर कल्याणी यांनी पदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे पाच आमदार आतापर्यंत तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी भाजपाच्या आमदारांची संख्या ७७ इतकी होती. ती आता ७० वर आली आहे.
भाजपामध्ये चांगलं काम नाही, केवळ षडयंत्र"भाजपामध्ये चांगल्या कामाला महत्त्व दिलं जात नाही. फक्त आणि फक्त षडयंत्र रचली जातात. षडयंत्राच्या अस्त्रानं कधीच युद्ध जिंकलं जात नाही. विकासानेच जनतेचं मन जिंकता येतं. नोटबंदीमुळे लोकांच्या हातात आता पैसे राहिले नाहीत. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी सातत्यानं महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या हातात पैसे पोहोचू दिले. उत्पन्नाचं साधन प्राप्त करुन दिलं. रायगंजमध्ये खूप आधीपासूनच षडयंत्र रचली जात आहेत. निवडणुकीत पराभूत करण्यासाठी माझ्याविरोधात देखील षडयंत्र रचलं गेलं होतं", असा आरोप करत कृष्ण कल्याणी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.