गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 05:46 PM2017-08-08T17:46:36+5:302017-08-08T17:47:31+5:30
गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून, आता फक्त निकालाची प्रतिक्षा उरली आहे
सूरत, दि. 8 - गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून, आता फक्त निकालाची प्रतिक्षा उरली आहे. तीन जागांसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि अहमद पटेल हे चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाकडे आवश्यक संख्याबळ असल्याने अमित शहा आणि स्मृती इराणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
तिस-या जागेसाठी बलवंत सिंह आणि काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्यामध्ये चुरस आहे. पक्षांतर्गत बंडखोरीमुळे या निवडणुकीत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले शंकरसिंह वाघेल आणि त्यांच्या सहा समर्थक आमदारांनी भाजपा उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांच्याबाजूने मतदान केल्याची शक्यता आहे. अहमद पटेल हरणार आहेत त्यामुळे मी त्यांना मतदान केले नाही असे वाघेलांनी स्पष्टपणे सांगितले.
काँग्रेसच्या 44 आमदारांसोबत बंगळुरुला न जाणारे राघवजी पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांच्याबाजूने मतदान केले आहे. वाघेल समर्थक धर्मेंद्रसिंह जाडेजा यांनी सुद्धा भाजपा उमेदवाराला मत दिले आहे. 44 आमदारांपैकी कोणी क्रॉस व्होटिंग किंवा नोटाचा पर्याय वापरला नाही तर, काँग्रेसला अहमद पटेल यांच्या विजयासाठी फक्त एका आमदाराच्या पाठिंब्याची गरज भासेल.
तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी वगळता भाजपाने बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेस गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादीचे दोन आमदार, संयुक्त जनता दल आणि गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदारावर अवलंबून आहे.
अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.