मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. '56 इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणाऱ्या मोदींना 55 तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही,' अशी बोचरी टीका प्रकाश राज यांनी केली आहे. कर्नाटकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडमोंडीनंतर भजापाला चांगलाच झटका बसला आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत मोदीवर निशाना साधला आहे. कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. तो रंगीबेरंगीच राहणार आहे. सामना सुरू होण्याआधीच संपला आहे. छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही त्यांना कर्नाटक राखता आलेलं नाही, असं प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकातील नागरिकांना आता पुढील गलिच्छ राजकारणासाठी तयार राहावं लागेल, असं सांगतानाच, मी यापुढंही जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहीन आणि प्रश्न विचारत राहीन, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
'छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 1:30 PM