गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य

By यदू जोशी | Published: November 29, 2022 08:43 AM2022-11-29T08:43:59+5:302022-11-29T08:45:34+5:30

कुतुबुद्दिन अन्सारी अन् अशोक मोची

What do the two faces of the Gujarat riots feel now? elction fiver in gujarat | गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य

गुजरात दंगलीतील दोन चेहऱ्यांना आता काय वाटते? उत्तरं ऐकून वाटेल आश्चर्य

googlenewsNext

यदु जोशी 

अहमदाबाद : गुजरात दंगलीतील ते दोन चेहरे आठवतात ना? अशोक परमार ऊर्फ अशोक मोची... गुजरातेत २००२ मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीच्या काळात हा तरुण कडव्या  हिंदुत्वाचा चेहरा बनला होता. त्याचवेळी जीव वाचण्यासाठी हात जोडून दया मागणारा कुतुबुद्दिन अन्सारीही जगभर गेला. या दोघांना आता काय वाटते?.

  एकाला हवे आहे परिवर्तन, दुसरा म्हणतो 
महागाई कमी करा; सरकार कोणतेही चालेल

अशोक मोची 
जुन्या अहमदाबाद शहरातील एका फूटपाथवर तीस वर्षांपासून अशोक मोची बूटपॉलिशचे काम करतात. त्यांची दैनावस्था तशीच आहे. मुस्लिमांना मारायला निघालेला हिंदू वीर असे कट्टरवाद्यांनी माझे वर्णन केले. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. दंगलीत माझा हात नव्हता, असता तर मला अटक झाली नसती का? पण मला दंगेखोरांचे प्रतीक बनविले गेले. त्याचा दहा वर्षे त्रास झाला. धमक्याही आल्या. आता आम्ही सगळे सौहार्दाने राहत आहोत, असे अशोक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. भाजपचे २५ वर्षांचे सरकार मी गुजरातमध्ये पाहिले, हे सरकार बदलले पाहिजे. भेदभाव, धार्मिकवाद, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न डोक्यावर असलेल्या गुजरातसाठी तेच उत्तर असेल, असे मतही अशोक यांनी व्यक्त केले. हिंसेने, दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्याने समाजाचे, आपले अन् देशाचेही कधीच भले होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

कुतुबुद्दिन अन्सारी 
‘वह एक हादसा था, याद कर के फायदा नही. तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी होते, पण त्याचे कधी मी भांडवल केले नाही. आज सगळे गुण्यागोविंदाने राहत आहेत. कोणत्या राजकीय पक्षाला वाईट, चांगले म्हणण्याइतका मी मोठा नाही. सामान्यांमध्ये कोणतीही तेढ नाही. राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी धर्मांचा वापर करतात. यावेळी सरकार कोणाचेही येऊ द्या, पण महागाई तेवढी कमी करा, आम्ही महागाईने त्रस्त आहोत, असे कुतुबुद्दिन अन्सारी सांगतात. ते बापूनगर, अहमदाबादमध्ये टेलरिंग काम करून कुटुंबाचा निर्वाह करतात. इतक्या वर्षात आता ते व अशोक मोची हे चांगले मित्र झाले आहेत. एकमेकांशी फोनवर बोलतात, कधीतरी भेटतातही. आम्ही जिगरी दोस्त आहोत; दोन्ही धर्मांनीही कटुता संपविली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: What do the two faces of the Gujarat riots feel now? elction fiver in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.