नवी दिल्ली: लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक राफेल विमान दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्तानं फ्रान्सला जाऊन राफेलची पूजा केली. भारतीय हवाई दलाला गेल्या अनेक वर्षांपासून राफेलची प्रतीक्षा होती. राफेलमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. भारतात दाखल होणाऱ्या पहिल्या राफेल विमानाच्या शेपटावर RB 001 असा क्रमांक लिहिण्यात आला आहे. या आरबीचा अर्थ राकेश भदोरिया असा होता. भदोरिया भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत. मात्र भदोरिया यांच्या नावाचा उल्लेख ते हवाई दल प्रमुख असल्यानं करण्यात आलेला नाही. भदोरिया यांनी हवाई दलाचे उपप्रमुख असताना केलेल्या कामगिरीसाठी त्यांच्या नावाचा उल्लेख राफेल विमानावर करण्यात आलेला आहे. भारत आणि फ्रान्समध्ये राफेलसाठी करार होत असताना भदोरियांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मे २०२० पर्यंत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ४ राफेल विमानं दाखल होतील. मोदी सरकारनं फ्रान्सकडून एकूण ३६ विमानं खरेदी केली आहेत. देशात दाखल होणाऱ्या पहिल्या चार राफेल विमानांचा समावेश १७ स्क्वॉड्रन गोल्डन ऍरोमध्ये करण्यात येईल. गोल्डन ऍरो अंबालामध्ये तैनात असते. राफेल विमानांची दुसरी स्क्वॉड्रन हासीमारामध्ये तैनात केली जाईल. पूर्व सीमावर्ती भागाच्या संरक्षणाची जबाबदारी या स्क्वॉड्रनकडे असेल.
राफेलवरील RB 001चा अर्थ काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 9:35 AM