जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती समजले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याने भारताच्या पदरात काय पडले, याबाबत मतमतांतरे असली तरी नव्या मैत्रीचे पर्व सुरू झाले, असे बहुतांश वाचकांनी कळविले आहे. अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीत तेथील निवासी भारतीयांची मते आपल्याकडे खेचण्याचा मुख्य उद्देश मनी बाळगूळच ट्रम्प यांनी हा दौरा केला. जर ट्रम्प पुन्हा निवडूण आले तरच भारताच्या पदरात काही पडू शकते, असेही वाचकांनी कळविले आहे.>...हा तर फक्त उत्सवी इव्हेंट!काही महिन्यांपूर्वी तिकडे अमेरिकेत ‘हाऊ डी मोदी’ तर त्याच धर्तीवर भारतात ‘नमस्ते ट्रम्प’ हा उत्सवी इव्हेंट आयोजित केला गेला. ‘‘तू माझी खाजव, मी तुझी खाजवतो’’ यातला हा प्रकार. भारताविषयी आस्था ठेवून ट्रम्प आलेले होते का? ट्रम्प भारताच्या बाजूने किती प्रमाणात आहेत? हा मूळ प्रश्न आहे. इथे येताना त्यांनी पाकिस्तानला अंतर दिलेले नाही, हा त्यांच्या मुत्सद्दीपणाचा भाग वाटतो. अध्यक्षीय निवडणूक जवळ आली असताना त्यांचा हा भारत दौरा अमेरिकेतील भारतीयांची मते खेचून घेण्याकरिता होता.- सावनी सुधीर अनवले, विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकी, लातूर>मेलेनियांनी दिला चांगला संदेशट्रम्प दाम्पत्याच्या दौºयाने महिलांना खूप महत्त्वाचा गुप्त संदेश मिळाला. त्यांच्या पहिल्या दिवसाचा दौरा, ३ मोठ्या शहरांत ४ स्थळांना भेटी आणि मान्यवरांशी चर्चा असा होता. सौ. ट्रम्प म्हणजे मेलेनिया यांनी या पूर्ण दिवसांत फक्त एकच ड्रेस घातला. त्यांच्याकडे दुसरे कपडे नव्हते, असे नाही. ‘साधी राहणी, उच्च विचार’ हा त्या मागील गुप्त संदेश होता. आपण एकाच दिवसाच्या चार कार्यक्रमाला किमान चार वेळा तरी ड्रेस बदलतो आणि वेगवेगळे दागिने घालून नटतो. देश असाच पुढे जात नाही. अनावश्यक खर्च पहा कसा टाळता येतो. दोन दिवसाच्या दौºयाला फक्त २ ड्रेस आणि ते ही सभ्य. आपला वेळ आणी पैसा फक्त प्रदर्शनातच खर्च होतो.- किरण सुरेश खाबिया,माणिकवाडा, ता. नेर, जि. यवतमाळ>ट्रम्प आले आणि गेले; हाती नाही काही लागले- परिमल माया सुधाकर,आंतरराष्टÑीय संबंधाचे अभ्यासक, पुणे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीने खूप काही मिळाले, असे म्हणता येणार नाही. तसेच नकारात्मक किंवा देशाला तोटा होईल देखील काही घडले नाही. भारत सरकारला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भेट देण्याची २००२ पासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांची कारकीर्द संपण्यापूर्वी त्यांना भारतात आणायचे होते. ते आले नसते तर मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. नवीन राष्ट्राध्यक्षांसोबत जेवढे चांगले संबंध दाखविले जातात, तेवढे नाहीत, असा संदेश गेला असता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट महत्वाची समजली जाते. कारण जागतिक संबंधातील महत्त्वाच्या नाड्या त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे या भेटीने दोन्ही देशांतील संबंध चांगले असल्याचे दाखविले, हे यश म्हणावे लागेल.या दौºयात ट्रम्प यांनी भारताला कोंडीत पकडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. भारतातील अंतर्गत परिस्थिती, काश्मीर, नागरिकता या मुद्यावर त्यांनी भाष्य केले असते तर मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरले असते. पण त्यांनी यांसह वादग्रस्त ठरू शकतात अशा सर्वच मुद्द्यांवर बोलणे टाळले. दोन्ही देश तयार असतील तर काश्मीरबाबत मध्यस्थी करेन, असे ते म्हणाले. त्याला फारसे महत्त्व नाही. हेही परराष्ट्र धोरणाला आलेले यश म्हणता येईल. या भेटीत तीन अब्ज डॉलर एवढ्या मोठ्या रकमेचा करार झाला आहे. या करारानुसार भारत अमेरिकेकडून शस्त्रसामुग्री व अत्याधुनिक हेलिकॉप्टर घेणार आहे. याला व्यापार करार असे म्हटले जात असले तरी हा एकतर्फी करार आहे. हा सरळसरळ व्यवहार असून यामध्ये अर्थातच अमेरिकेचा जास्त फायदा झाला आहे. देशांतर्गत काश्मीर किंवा अन्य मुद्यावर आम्ही जे काही करतोय ते आम्हाला करू द्या. त्यात हस्तक्षेप करू नका, असे अमेरिकेला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी हा करार केला असावा असे दिसते. पण, या करारामुळे नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वी आपण शस्त्रसामुग्रीसाठी रशियावर अवलंबून होतो. कोणत्याही एका देशावर अवलंबून नको म्हणून अमेरिकेकडूनही दहा वर्षांपूर्वी खरेदी सुरू केली. पण आता आपण अमेरिकेवर जास्त अवलंबून राहतोय का, अशी परिस्थती आहे. या कराराने ‘मेक इन इंडिया’ला बुस्ट नाही. या करारात नवीन काहीच नाही. यापूर्वीही अमेरिकेकडून १८ अब्ज डॉलरची शस्त्रखरेदी केली आहे. इतर व्यापार करारांमध्ये ट्रम्प यांना घाई नसल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या दौºयाने खूप काही हाती लागले नाही, असे म्हणावे लागेल.>दहशतवादाविरुद्ध झालेले मतैक्य बळकटी देणारे-- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल,वर्धाट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत भेटीतून भारत अमेरिका संबंधाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमाला जवळपास दीड लाख लोकांची उपस्थिती होती. साबरमती आश्रम, ताजमहाल या स्थळांना भेटी दिल्या. भारतासोबत संरक्षक करार केला, मोदी यांच्या घेतलेल्या गळाभेटी, दहशतवादाविरुद्ध आक्रमक कारवाई करण्याचा पाकिस्तानला दिलेला इशारा, धार्मिक सहिष्णुता यावर भारताची केलेली प्रशंसा, या सर्व बाबी भारत - अमेरिका द्विपक्षीय संबंधाला बळकटी प्रदान करणाºया व भारत अमेरिका संबंधाच्या नव्या पर्वाची ग्वाही देणाºया आहेत.या दौºयाची महत्त्वाची फलश्रुती म्हणजे इस्लामिक दहशतवादाबाबत अमेरिका व भारताचे झालेले मैतैक्य व सीमेवरील दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचे पाकिस्तानला केलेले आवाहन, या भारताच्या जमेच्या बाजू आहेत. पाकिस्तानकडून होणाºया दहशतवादाचा मुद्दा भारत प्रकर्षाने अनेक वर्षांपासून जागतिक मंचावर मांडत आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमातून ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्याचा इशारा दिला. इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यास भारत आणि अमेरिका कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. दुसरी महत्त्वाची फलश्रुती म्हणजे भारत-अमेरिका संरक्षण संबंधावर झालेले शिक्कामोर्तब. संरक्षण करारातून ट्रम्प यांनी भारताचे सामरिक बळ वाढविण्यासाठी भरीव साह्य केले. अमेरिका भारताला अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर व अन्य अद्ययावत युद्धसाहित्य देणार असल्याने भारताचे सामरिक बळ वाढणार आहे. भारतासमोर पाकिस्तान व चीनचे आव्हान असल्यामुळे विस्तारवादी चीनला शह देण्याचा दृष्टीने उभय देशांमधील संरक्षण करारकडे बघणे आवश्यक आहे.या दौºयाची सर्वात महत्त्वाची विशेषता म्हणजे भारताच्या धार्मिक सलोख्याची ट्रम्प यांनी केलेली प्रशंसा होय. व्यक्ती स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, प्रत्येक माणसाचा सन्मान त्याचबरोबर धार्मिक सलोखा ही भारताची मोठी परंपरा आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी भारताची प्रशंसा केली. सीएए व एनआरसी वरून भारतात आंदोलनाचा वणवा पेटलेला असताना ट्रम्प यांनी अत्यंत संयमाने भाष्य करीत पाकिस्तान सारख्या देशांना जोरदार चपराक दिली. भारतात शांतता, कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांनी संवेदनशील मुद्दे टाळले, ही भारताच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. दौºयात उभय देशांमध्ये व्यापारावर फारशी सहमती होऊ शकली नसली तरी भविष्यात अमेरिका व्यापार कारारबाबत अधिक सुलभता आणेल, असे आश्वासन ट्रम्प यांनी भारताला दिले. एकंदरीत, ट्रम्प यांच्या भारत भेटीने भारत अमेरिका संबंधाचे नवे मैत्रीपर्व सुरू झाले, ही बाब मान्यच करावी लागेल, एवढे मात्र नक्की!>ट्रम्प आले आणि पर्यटन करुनी गेलेसद्याच्या परिस्थितीत आपला देश ज्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे ट्रम्प भेटीत व्यापार विषयक करार होतील आणि अमेरिकन गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार भारतात उपलब्ध होतील असे वाटत होते. पण, तसे काही झाले नाही. या दौºयावर मोठ्या प्रमाणावर खर्च करुनही विशेष असे आपल्या देशाच्या पदरात काही पडले नाही. ते आले त्यांनी पर्यटन केले आणि समजूत म्हणून सरंक्षण करार करून निघून गेले असेच म्हणावे लागेल. या दौºयाने पाकिस्तानला मात्र चांगली धडकी भरली असेल, हे मात्र नक्की.- अॅड. दिनेशकुमार दहे,मानवत, जि. परभणी>मते मिळवण्यासाठी गळाभेटी!जगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक माणूस आपआपल्या परीने नेहमीच जीव तोडून प्रयत्न करतो. मग तो नोकर असो की राष्ट्राध्यक्ष. राष्ट्रपती असो की पंतप्रधान. प्रत्येकाला काम कमी करून प्रसिद्धी जास्त हवी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले. सर्व जगाला कळावे म्हणून भारतातील सर्व लोकशाहीचे रक्षक, पालक हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत राहिले. खरे तर अमेरिका हा भारताचा कधीच विश्वासू मित्र नव्हता. पुढेही राहील हे सांगता येत नाही. अमेरिका स्वत:चे हित जपण्यासाठीच दुसºया देशाचा उपयोग करत आला आहे. अमेरिकचे धोरण नेहमीच ‘गरज सरो, वैद्य मरो’ असेच राहिलेले आहे. अमेरिकेत या वर्षात होणाºया राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत बोलघेवड्या ट्रम्प यांना भारतीय अमेरिकन मतदारांची साथ हवी आहे. त्यांना भारताची,
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याने भारताच्या पदरात काय पडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 3:45 AM