मुस्लीम वस्त्यांमध्ये मुद्दाम पाकविरोधी घोषणा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:03 AM2018-01-31T02:03:57+5:302018-01-31T02:04:13+5:30
मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला.
कासगंज : मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला.
कासगंज येथे उसळलेल्या जातीय दंगलीत २३ वर्षांचा एक युवक ठार झाला. प्रजासत्ताकदिनी एका गटाने मुस्लीम वस्तीमध्ये तिरंगा यात्रा काढली. त्यानंतर कासगंजमध्ये जातीय दंगल उसळली. खून व हिंसाचार केल्याप्रकरणी शंभर जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात आर. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कासगंजमधील घटना तशी किरकोळ स्वरूपाची होती, पण तिचे विपरित परिणाम झाले. कासगंजच्या पोलिस अधीक्षकाची बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाºयांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बरेलीचे जिल्हाधिकारी म्हणून गेल्या वर्षी आर. व्ही. सिंग यांनी सूत्रे हाती घेतली. त्यापूर्वी ते लष्करात अधिकारी होते. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आर. व्ही. सिंग यांनी लिहिले की, बरेली येथील खेलाम भागातही गेल्या वर्षी असाच प्रकार घडला होता. भगवान शंकराचे भक्त असलेल्यांनी मुस्लीम वस्तीमधून मिरवणूक काढून, पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. अशा घोषणांची खरेच गरज आहे का?
या फेसबुक पोस्टसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री व बरेली शहराचे आमदार राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, ही पोस्ट मी वाचलेली नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. (वृत्तसंस्था)
...तर मीही रोखेन
माझ्या घराच्या बाहेर विनाकारण जर कोणी अशा घोषणा द्यायला लागले तर मी त्यांना तसे करण्यापासून लगेच रोखेन, असेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टवर २३५ प्रतिक्रियाही आल्या होत्या. मात्र नंतर आर. व्ही. सिंग यांनी ही फेसबुक पोस्ट काढून टाकली.