चारा घोटाळा, जमिनींच्या बदल्यात नोकऱ्यांच्या घोटाळ्यात अडकलेले लालू प्रसाद यादव यांच्या मंत्र्याचा मुलगा चक्क शिपाई म्हणून सरकारी नोकरीला लागला आहे. तर पुतण्या वेटिंग लिस्टवर असल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये नाही तर झारखंडमध्ये हा किस्सा समोर आला आहे. आता मुलाचे स्वकर्तुत्व की वशिलेबाजी हे ठरविण्यात तमाम जनतेचे डोके भंडावून गेले आहे.
हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात राजदचे सत्यानंद भोक्ता हे मंत्री आहेत. आता मंत्र्याचा मुलगा शिपायची नोकरी करेल का असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. परंतू, सत्यानंद यांचा मुलगा मुकेश कुमार हा चतरा न्यायालयात शिपाई म्हणून नोकरीला लागला आहे. तर पुतण्या रामदेव कुमार भोक्ता याचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे. शुक्रवारी चतरा न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्तीचा निकाल लागला आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी एकूण १९ उमेदवारांची निवड झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी मुकेश कुमारचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. त्याच्या लग्नात हेमंत सोरेन यांच्यासह अनेक मंत्री, आमदार सहभागी झाले होते. त्यातच या मुलाला शिपायाची नोकरी लागल्याने झारखंडमध्ये चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
अनेकदा आमदार, २००० मध्ये पहिल्यांदा निवडून गेलेले...
सत्यानंद भोक्ता हे झारखंडचे कामगार, रोजगार आणि कौशल्य विकास मंत्री आहेत. तसेच चतरा मतदारसंघातून आमदारही आहेत. भोक्ता यांनी 2000 साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी राजदचे जनार्दन पासवान यांचा पराभव केला व आमदार झाले होते. २००४ मध्येही ते जिंकले होते. २०१४ ला भाजपाने तिकीट दिले नाही म्हणून ते राजदमध्ये गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार व मंत्री बनले. झारखंडमध्ये ते राजदचे एकमेव आमदार आहेत.