गुजरातमध्ये मोदी येत आहेत का विचारल्यावर कुत्र्याचा होकार, भाजपा नेत्याने ट्विट केला व्हिडीओ; युजर्स भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:09 PM2017-12-15T17:09:34+5:302017-12-15T17:22:34+5:30
भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला असल्याने युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत
नवी दिल्ली - भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला असल्याने युजर्सच्या निशाण्यावर आले आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर टीका करत आहेत. अमित मालवीय यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये एका कुत्रा दिसत आहे. या कुत्र्याला एका महिलेने उचलून घेतलेलं आहे. ही महिला त्या कुत्र्याला प्रश्न विचारताना दिसत आहे.
व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, महिला आधी कुत्र्याला विचारते गुजरातमध्ये काँग्रेस येतय का ? यावर कुत्रा काहीच प्रतिक्रिया न देता शांत राहतो. नंतर महिला विचारते गुजरातमध्ये राहुल गांधी येतायत का ? या प्रश्नावरही कुत्रा काहीच प्रतिक्रिया देत नाही. यानंतर महिला विचारते गुजरातमध्ये मोदी येतायत का ? या प्रश्नावर कुत्रा दोन्ही पाय वर करुन प्रतिक्रिया देतो. 32 सेकंदाचा हा व्हिडीओ अमित मालवीय यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमुळे ते ट्रोल होत आहेत.
Cute little thing knows it all... pic.twitter.com/Ds67QZYGHT
— Amit Malviya (@malviyamit) December 15, 2017
एक्झिट पोलचा कौल : दोन्ही राज्यांमध्ये कमळ; गुजरात भाजपाकडेच, हिमाचल काँग्रेसच्या हातातून जाणार
गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले असून, सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा पक्ष काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेईल, असे एकमत झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले, तर हिमाचल प्रदेशात एक महिन्यापूर्वी मतदान झाले होते. आजचे मतदान संपताच दोन्ही राज्यांमध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल आणि हिमाचल प्रदेशात सत्तांतर होऊन आणखी एक काँग्रेसशासित राज्य भाजपाच्या झोळीत जाईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीत या दोघांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी ते पद सोडून पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांची या राज्यावरील पकड सैल झाली की अधिक बळकट झाली याचा कौल म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदींनीही काहीही झाले तरी गुजरात हातचे जाऊ द्यायचे नाही या पक्क्या इराद्याने पंतप्रधानपदाच्या सर्व जबाबदा-या बाजूला ठेवून प्रचाराचे जातीने नेतृत्व केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळालेले राहुल गांधी यांनीही नव्या दमाने व कल्पकतेने प्रचाराची शिकस्त केली.
सरतेशेवटी दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी घसरली आणि गुजरातची निवडणूक ही मोदी व राहुल गांधी यांच्यातील व्यक्तिगत लढाई असे चित्र निर्माण झाले. ‘एक्झिट पोल’ हे ब्रह्मवाक्य नाही हे मान्य केले आणि याआधी अनेक एक्झिट पोलचे अंदाज काही वेळा सपशेल चुकलेही आहेत हे गृहीत धरले आणि यंदा आकडे कमी-जास्त झाले तरी त्यातून दिसणारा सत्तेचा अंतिम कौल चुकेल, असे त्यामुळेच वाटत नाही.
एक्झिट पोलनुसार भाजपा गुजरातेत विजयी झाल्यास, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून चौखूर सुटलेल्या भाजपाच्या वारूची दौड अद्यापही सुरूच आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नशिबी आणखी एक पराभव आला आहे, असेच म्हणावे लागेल.