नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये रेल्वेला पोहोचण्यास उशिर झाल्यामुळे मेडिकलची इच्छा बाळगणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रविवारी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा म्हणजे NEET घेण्यात आली होती. मात्र, कर्नाटकमधील शेकडो जवळपास 500 विद्यार्थी या परीक्षेला मुकले होते. कारण, बंगळुरू येथे परीक्षा सुरू झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने त्यांची रेल्वे बंगळुरूला पोहोचली. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना NEET ची परीक्षा देता आली नाही. उत्तर कर्नाटकातून सुटणाऱ्या हम्पी एक्सप्रेसबाबत ही घटना घडली.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच, याप्रकरणी ट्विट करुन त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि मानव विकास मंत्रालयाला मेंशन केले होते. त्यानंतर, नीट परीक्षेचे प्रथमच आयोजन करणाऱ्या एजन्सीने या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे म्हटले होते. तसेच ओडिशातही फनी वादळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी घेण्यात येईल, असे एजन्सीने स्पष्ट केले होते. दरम्यान, आता केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करुन रेल्वेला उशिरा झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या भविष्याची चिंता करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.