मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी नवीन समितीचा विचार फास्ट ट्रॅक वर सुरू असून लवकरात लवकर या विषयावर निर्णय अपेक्षित आहे असे ठोस आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिले. मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा लवकरात लवकर दर्जा मिळावा यासाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर मेघवाल यांनी उत्तर दिलं.
यापूर्वी ६ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकसभेत गोपाळ शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९, ४ जानेवारी २०२०, ७ फेब्रुवारी २०२० या प्रमाणे सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विचार सुरू असून, त्यासाठी अन्य मंत्रालये तसेच साहित्य अकादमीमार्फत भाषा तज्ज्ञांच्या समितीशी सल्लामसलत सुरू आहे, असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यापूर्वी त्यांनी यासंदर्भात रमेश पोखरियाल निशंक तसेच तत्कालीन सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल यांना प्रत्यक्ष भेटून याविषयी चर्चा केली होती. तत्कालीन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधी विचारविमर्श करण्याचे महाराष्ट्र सरकारच्या भाषा विशेषज्ज्ञ समितिला सांगितले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून नवीन समिती स्थापन करण्यात यावी असे निर्देश तात्कालिन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना दिले होते अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.आतापर्यंत तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळेलउत्तर मुंबईच्या जनतेने मला सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे.मराठी भाषेवर आपले प्रेम असून माझ्या सोबत अनेक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक सुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. २०१५ पासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असून आपल्या या खासदारकीच्या टर्म मध्ये मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.