नवी दिल्ली: भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. या संपूर्ण प्रकरणावर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जातो आहे. मात्र लोकशाहीचा पराभव झाल्यानं देशभरात दु:ख व्यक्त होतं आहे, असं ट्विट करत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करुन भाजपावर निशाणा साधला. 'भाजपाकडून तर्कहीन दावे केले जात आहेत. भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नाही. या परिस्थितीत सत्ता स्थापन करणं म्हणजे घटनेची खिल्ली उडवण्यासारखं आहे. काँग्रेसकडून पोकळ्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र भारतात लोकशाहीच्या पराजयाचं दु:ख व्यक्त होतं आहे,' असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाकडे सध्या 105 आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत भाजपाला 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.