जी-२०च्या यशामागील पडद्यामागचे चेहरे कोण? अनेक महिने सुरू होती जोरदार तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 06:33 AM2023-09-11T06:33:58+5:302023-09-11T06:35:10+5:30
G20 Summit: जी-२० बैठकीच्या यशामागे अनेक महिन्यांची भारताची जोरदार तयारी आणि योजनाबद्ध पद्धतीने कुटनीतीक, आर्थिक, डिजिटल व सांस्कृतिक आघाडीवरील रणनीतीची अंमलबजावणी आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली - जी-२० बैठकीच्या यशामागे अनेक महिन्यांची भारताची जोरदार तयारी आणि योजनाबद्ध पद्धतीने कुटनीतीक, आर्थिक, डिजिटल व सांस्कृतिक आघाडीवरील रणनीतीची अंमलबजावणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने काम केलेले आहे.
जी-२० शिखर परिषदेच्या ऐतिहासिक आयोजनात जागतिकस्तरावर भारताच्या मोठ्या मानसन्मानामागे काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचा उल्लेख करावाच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले होते की, देशातील ५०पेक्षा जास्त शहरांत जी-२० देशांच्या विविध विषयांवर आयोजन झाले पाहिजे. हे लक्षात घेऊन जी-२० देशांच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्तमंत्री, पर्यटन, संस्कृती, कम्युनिकेशन, गृह, विदेश, संरक्षण, शहरी विकास, रेल्वे, कृषी, आरोग्यमंत्र्यांचे संमेलन देशाच्या विविध शहरांत अनेक महिन्यांपासून आयोजित करण्यात आले होते. या आयोजनाने संपूर्ण देशात जी-२०बाबत जागरूकता वाढविण्याचे काम केले.
जी-२० बैठकीच्या यशस्वी आयोजनात पडद्यामागे ज्यांची सर्वांत महत्त्वाची भूमिका मानली जात आहे, त्यात सर्वांत प्रमुख नाव केंद्रीय विदेशमंत्री एस. जयशंकर यांचे आहे. त्यांच्याबरोबर आयोजनाचे शेरपा अमिताभ कांत, आयोजनाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रंगला, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भूमिका महत्त्वाची आहे.
रशियावरून पेच
नवी दिल्ली घोषणापत्रात रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाचे नाव समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून पेच निर्माण झाला होता. रशियाचे नाव समाविष्ट केल्यास चीनसह अनेक देश भडकले असते व जी-२० बैठकीची कोणत्याही घोषणापत्राशिवाय समाप्ती झाली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व चान्सलर यांच्याशी चर्चा केली होती. जी-२० हा कोणतेही राजनीतीक व्यासपीठ नाही. हे आर्थिक व्यासपीठ आहे. रशियाचे नाव घेतल्याशिवायही पुढे जाऊ शकतो.