काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाचा परिणाम नेमका कोणावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:24 AM2022-05-20T05:24:25+5:302022-05-20T05:25:26+5:30

चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण संघटनेत लागू करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या धोरणाचा कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

who exactly is affected by the congress one person one position policy | काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाचा परिणाम नेमका कोणावर?

काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाचा परिणाम नेमका कोणावर?

Next

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात संघटनेत ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण लागू करण्याचा निर्णय झाला. या धोरणाची अंमलबजावणी केल्यास लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, सरचिटणीस मुकुल वासनिक, विचार विभागाच्या अध्यक्ष गिरिजा व्यास, खासदार माणिक टागोर आणि सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांना एका पदाचा त्याग करावा लागणार आहे.

चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण संघटनेत लागू करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या धोरणाचा कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ता नसल्याने अधिकाधिक नेत्यांना संघटनेत पदे देऊन त्यांचे समाधान करण्याचे आव्हान सध्या पक्षासमोर आहे. जी-२३ मधील काही असंतुष्टांना स्थान देऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्नही पक्षश्रेष्ठी करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून चिंतन शिबिरापूर्वीच एक पद काढून घेण्यात आले आहे. ते प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही होते.

या व्यक्ती, हे पद...

अधीररंजन चौधरी : लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते असून पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्षही आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; परंतु तो स्वीकारण्यात आला नाही.

मुकुल वासनिक : मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस मुकुल वासनिक हे केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत.

गिरिजा व्यास : काँग्रेस विचार विभागाच्या अध्यक्ष असून केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्याही आहेत.

माणिक टागोर : तामिळनाडूचे खासदार असलेले माणिक टागोर संसदेत काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि तेलंगणचे प्रभारी आहेत.

रणदीपसिंह सुरजेवाला सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला हे कर्नाटकचेही प्रभारी आहेत.

या नेत्यांना संघटनेतील एका पदाचा त्याग करावा लागणार आहे.
 

Web Title: who exactly is affected by the congress one person one position policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.