भाजपच्या सर्वोच्च कोअर समितीचे कोण असणार दोन नवे सदस्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:26 AM2019-05-29T04:26:13+5:302019-05-29T04:26:32+5:30
सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील सर्वधिकार असलेल्या कोअर समितीमध्ये आता कोणत्या दोन नेत्यांचा समावेश होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील सर्वधिकार असलेल्या कोअर समितीमध्ये आता कोणत्या दोन नेत्यांचा समावेश होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्याने, तर अरुण जेटली यांची प्रकृती चांगली नसल्याने कोअर समितीवर दोन नेमणुका अपेक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही या समितीचे सदस्य आहेत. राज्यसभेतील नेते या नात्याने अरुण जेटली या समितीचे सदस्य होते. शिवाय ७४ पेक्षा कमी वयाचे माजी अध्यक्ष या समितीवर असतात. त्यामुळे व्यंकय्या नायडू हेही तिथे होते. ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर रिक्त जागा भरण्यात आली नव्हती. या समितीला सर्वाधिकार असून, तिने घेतलेल्या निर्णयांवर पक्षाचे संसदीय मंडळ शिक्कामोर्तब करते. त्या मंडळात सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, रामलाल यादव, थावरचंद गेहलोत यांचा समावेश आहे.
आता कोअर समितीवर जे. पी. नड्डा यांना घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. दुसरे नाव रविशंकर प्रसाद यांचे आहे. सुषमा स्वराज यांनी नव्या सरकारमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्या संसदीय मंडळावरच राहतील. अन्यथा स्मृती इराणी वा निर्मला सीतारामन यांना संसदीय समितीमध्ये सामावून घेतले जाईल, असे दिसत आहे.