हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): अयोध्येत राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात उपस्थित राहण्याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही.
राममंदिर न्यास आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले की, एक शिष्टमंडळ अयोध्येला जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; कारण, त्यांच्या प्रकृतीच्या काही तक्रारी आहेत.
राममंदिराचे श्रेय कुणाचे?
फेब्रुवारी १९८६ मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारच्या काळात अयोध्येतील वादग्रस्त जागेचे दरवाजे उघडण्यात आले होते. राजीव गांधी यांनी ऑक्टोबर १९८९ मध्ये फैजाबाद येथून त्यांच्या निवडणूक मोहिमेची सुरुवात केली होती. मणिशंकर अय्यर यांनी लिहिलेल्या त्यांच्या भाषणात ‘रामराज्य’ असा अलिखित संदर्भ दिला. एवढेच नव्हे तर, त्यांच्या सरकारनेच विहिंप नेते अशोक सिंघल यांना नोव्हेंबर १९८९ मध्ये शिलान्यासाची परवानगी दिली होती. त्यामुळे राम मंदिराचे श्रेय काँग्रेसने घ्यावे, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते.