प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी, पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:37 AM2021-02-01T04:37:40+5:302021-02-01T04:38:13+5:30
mann ki baat News : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.
नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी पावले भविष्यात उचलणार आहोत. यंदाच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला नेत्रदीपक विजय ते राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान अशा अनेक घटनांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत १५ दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली आहे.
औषधे, लसींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला यंदा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांपैकी आपापल्या भागातील स्वातंत्र्यसेनानींबद्दल युवा पिढीने लेखन करायला हवे, पुस्तके लिहायला हवीत.
जालन्याच्या डॉ. मंत्रींचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख
मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये जालन्याचे डॉ. स्वप्नील मंत्री यांचा उल्लेख केला. मंत्री म्हणाले की, “मी मोदी यांना रस्ते आणि महिलांच्या सुरक्षेवर सूचना आणि घोषणा पाठवल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंतप्रधानांनी आज लोकांना रस्ते सुरक्षेवर आवाहन केले हा अभिमानाचा मुद्दा आहे.”