नवी दिल्ली : मोदी सरकारवर व त्यातील काही नेत्यांवर सतत टीका करणारे भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले की, मी पूर्वीपासूनच त्यांच्याबरोबर होतो. मला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची गरज नाही, या त्यांच्या विधानामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते गोंधळून गेले आहे.
काँग्रेसचे कीर्ती आझाद, अशोक तन्वर व जनता दल (संयुक्त)चे पवन वर्मा यांनी मंगळवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आज स्वामी हेही तृणमूलमध्ये जाणार, अशा बातम्या भेटीआधीच पसरल्या. सनातन धर्म संस्थेने केलेल्या ट्विटमध्ये पश्चिम बंगालमधील हिंदूवरील अत्याचारांचा मुद्दा एकट्या स्वामी यांनीच उपस्थित केला असे म्हटले आहे. ते स्वामी यांनी रिट्विट केल्याने ममता बॅनर्जी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असावा, असे बोलले जात आहे.