माजी मंत्री वर्मांना अटक का नाही?; सर्वोच्च न्यायालयाची बिहार पोलिसांना विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:49 AM2018-10-31T04:49:12+5:302018-10-31T04:49:57+5:30
मुजफ्फरपूर येथील निवारागृहातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरून निवासस्थानाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार पोलिसांना विचारला.
नवी दिल्ली : मुजफ्फरपूर येथील निवारागृहातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा यांच्या घरून निवासस्थानाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिहार पोलिसांना विचारला. हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर वर्मा यांनी राजीनामा दिला होता.
या शस्त्रास्त्रेप्रकरणी मंजू वर्मा यांचे पती चंद्रशेखर वर्मा हे सोमवारी बेगुसराई न्यायालयात शरण आले. न्यायमूर्ती एम. बी. लोकूर, एस. ए. नझीर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने या लैंगिक शोषण आरोपातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याला बिहारच्या भागलपूर तुरुंगातून पंजाबमध्ये पटियालातील अति सुरक्षा तुरुंगात हलवण्यात यावे, असा आदेश दिला. ठाकूर अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असून, सध्या तो ज्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे तेथे त्याच्या ताब्यातून मोबाईल फोन जप्त करण्यात आला, असे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले होते. या निवारागृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार पहिल्यांदा टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायसेन्सच्या (टिस) आॅडिट रिपोर्टमध्ये उघडकीस आले होते. हा अहवाल राज्याच्या समाजकल्याण विभागाला सादर करण्यात आला होता.
भयंकर आणि भीतिदायक
या प्रकरणाच्या चौकशीतून जो तपशील सर्वोच्च न्यायालयासमोर आला तो वाचून ‘भयंकर’ आणि ‘भीतिदायक’ अशा शब्दांत त्याचे वर्णन करण्यात आले. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) ब्रजेश ठाकूरवरील आरोपांचा जो संदर्भ दिला त्याची नोंद घेऊन न्यायालयाने त्याला नोटीस देऊन तुम्हाला बिहारबाहेरच्या तुरुंगात का हलवण्यात येऊ नये, अशी विचारणा केली होती.