महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 04:00 PM2019-11-21T16:00:51+5:302019-11-21T16:02:07+5:30
राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या मुद्दावरून गल्ली ते दिल्ली राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसचे राज्यातील नेते या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या सत्तास्थापनेत रस घेताना दिसून येत नाहीये.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते. यापैकी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तास्थापनेपासून थोडं अंतर दूर होती. तर कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी झाले होते. मात्र राजकीय डावपेच आणि आमदार फुटल्यामुळे येथील सत्ता पुन्हा भाजपकडे गेली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस बॅकफुटला गेली होती. त्यानंतरही हार न मानता राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी प्रचार सभा घेताना दिसले. त्यामुळे राहुल पुन्हा जोमाने मैदानात उतरले अशी चर्चा होती. महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी चांगली होणार नाही, हे सर्वश्रूत होते. तसचं झालं. मात्र अनपेक्षीतपणे काँग्रेसकडे सत्तेत जाण्याची संधी आली आहे. शिवसेनेने हात पुढं केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सत्तेत सामील होण्याचे योग आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आणि दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू आहे. शरद पवार खुद्द लक्ष घालत असून सोनिया गांधी यांनी देखील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग दिला आहे. मात्र राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मान्य असेल तर राहुल कुठं तरी दिसायला हवे होते, असंही अनेक नेत्यांना वाटत आहे.