Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 11:06 AM2022-06-19T11:06:36+5:302022-06-19T11:07:41+5:30
अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. मात्र, या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. देशभरातील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरुन जोरदार निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. आज देशभरात सुमारे ७०० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे. भडकलेल्या जमावानं ट्रेन आणि इतर मालमत्तेला आग लावली आहे. ज्यामुळे पोलिसांना राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ३२५ जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये या योजनेला विरोध वाढताना दिसत आहे. तेलंगणामध्ये देखील हिंसक आंदोलन सुरु आहे. तिथेही एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.
अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये गदारोळ सुरू असला तरी त्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लष्कराच्या जमीन, जल आणि हवाई दलाच्या तिन्ही शाखांमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येतात. तसेच गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ३७ हजार ४५९ जवानांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे अग्निपथ योजनेविरोधात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासन दोषींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याची राजधानी पाटण्यापासून राज्याच्या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या काही कोचिंग सेंटरच्या परिसरात विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याचे उघड झाले आहे.
पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण-
आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाक-
आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.