भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल अन्य चार राज्यांसोबत मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र, इतर सर्व राज्यांचे निकाल जाहीर झाले तरीही मध्य प्रदेशमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक आणि रात्री 8 वाजेपर्यंत केवळ 13 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले होते. EVM च्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निकाल जाहीर करण्यास 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, बुधवारी सकाळी 8.21 वाजता चित्र स्पष्ट झाले. काँग्रेसला 114 आणि भाजपला 109 जागा मिळाल्या. भारतात 1998 पासून ईव्हीएमचा वापर सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 3.30 वाजताही बहुमत गाठण्यासाठी रस्सीखेच सुरुच होती.
उशिर का झाला?मध्यप्रदेशमध्ये व्हीव्हीपॅट मशिनचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. यानुसार सर्व 230 विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी एका मतदान केंद्राला निवडण्य़ात आले होते. यामुळे ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमधील मतांचा ताळेबंद व्हीव्हीपॅट मशिनच्या पावत्यांसोबत करण्यात आला. ही मोजणी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत करण्यात आली होती. प्रत्येक फेरीनंतर प्रतिनिधींना त्याचे प्रिंटआऊटही देण्यात आले होते. या सर्व प्रक्रियेमुळे निकालाच्या घोषणेला विलंब झाला. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 14,600 कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी नेमण्यात आले होते. शिवाय भाजप आणि काँग्रेसमधील बहुमतासाठीची रस्सीखेच हे देखिल एक कारण विलंबामागे आहे. निकाल एका बाजुने लागले असते तर लवकर चित्र स्पष्ट झाले असते.
मध्य प्रदेशमध्येच पहिल्यांदा झाला होता वापर...ईव्हीएम मशिने 1989-90 मध्येच बनविण्यात आली होती. मात्र, 1998 मध्ये मध्य प्रदेशच्या पाच, राजस्थानच्या पाच आणि दिल्लीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. मात्र, व्हीव्हीपॅट या मशिनचा वापर 2013 मध्ये नागालँडमध्ये करण्यात आला होता.
मग लोकसभेला काय करणार? मध्यप्रदेशमधील 230 मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राच्या मतमोजणीला 24 तासांचा वेळ लागला असेल तर लोकसभेला 543 मतदारसंघांमधील निकाल जाहीर करताना किती वेळ लागेल यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. यामुळे इव्हीएमवर एकीकडे संशय व्यक्त केला जाऊ लागल्यावर व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा निर्णय हा वेळखाऊ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.