ब्रिजभूषण सिंह राजीनामा देणार की अध्यक्षपदी कायम राहणार?; आज आयोध्येत होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 09:02 AM2023-01-22T09:02:35+5:302023-01-22T09:07:00+5:30
सदर प्रकरणावर आज (२२ जानेवारी) उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होणाऱ्या कुस्तीगीर संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होऊ शकते.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होतं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन करणयात आलं. महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण आणि छळाचे आरोप केले आहेत. तसेच, हे सर्व आंदोलक कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणावर आज (२२ जानेवारी) उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे होणाऱ्या कुस्तीगीर संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक होऊ शकते. या बैठकीत ब्रिजभूषण शरण सिंह कार्यकारिणीच्या सदस्यांसमोर आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे अध्यक्षपद कायम ठेवायचे की पायउतार करायचे यावर चर्चा होईल. दरम्यान क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचायासोबत झालेल्या चर्चेच्या दूसऱ्या फेरीनंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना ७२ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने जबाब नोंदवण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांचा मुलगा प्रतीक भूषण सिंह याने याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही नोटीस बजावली आहे. दरम्यान, ब्रिजभूषण यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
दरम्यान, जगभरात देशाचे नाव चमकवणार्या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर दि. १८ जानेवारी, २०२३ रोजी निदर्शने देखील सुरू केली आहेत.
मी तोंड उघडले तर...
ब्रिजभूषण सिंह यांना त्यांच्या पदावरुन हटवले जाऊ शकते, असे वृत्त आहे. याबाबत माध्यमाशी बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, 'मी आता तोंड उघडले तर त्सुनामी येईल. केवळ 3 टक्के कुस्तीपटू मला विरोध करत आहेत. माझ्यावरील शारीरिक शोषणाचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. आरोप खरे ठरले तर मी फाशी देईन, असेही ते म्हणाले होते.
दीपेंद्र हुड्डांवर आरोप
माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असून, हे सर्व काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांच्या सांगण्यावरून होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, जे पैलवान आरोप करत आहेत, त्यांची कारकीर्द संपलेली आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, आंदोलन करणारे बहुतेक कुस्तीपटू एकाच समाजातील आहेत. पक्षाकडून मला जो काही आदेश येईल, तो मी पाळेन, असेही ते म्हणाले.