नवी दिल्ली: देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान म्हटलं. आसाममध्ये लागू असलेली नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आसाम करारचा हिस्सा असल्याचंदेखील शहा म्हणाले. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं असेल. आम्ही ज्या संकल्पपत्राच्या आधारे निवडून आलो आहोत, त्यामध्ये याचा समावेश आहे, असं शहांनी म्हटलं. देशाच्या इंचनइंच जमिनीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर राहतात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढलं जाईल, असं शहा म्हणाले. 'एनआरसी लागू करण्यामागील सरकारचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. काही भारतीयांना भारतीय नागरिक मानलं गेलेलं नाही. अशा २५ लाख लोकांचे अर्ज राष्ट्रपती आणि सरकारकडे आले आहेत. तर देशाबाहेरुन आलेल्या काहींना एनआरसीच्या अंतर्गत भारतीय मानलं गेलं आहे. राष्ट्रपती आणि सरकारकडे आलेल्या अर्जांवर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे थोडा वेळ मागण्यात आला आहे,' असं शहांनी म्हटलं.
देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:22 PM