लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे जगभरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षे घरातूनच काम करण्यास सांगण्याची शक्यता आहे.
कर्मचारी जितके जास्त काळ घरात राहातील तितके त्यांना पुन्हा कार्यालयामध्ये बोलाविणे किंवा त्या माणसांनी नोकरी न सोडता कायम राहाणे या गोष्टी कठीण होऊन बसतील अशी वेगळी चिंताही काही कंपन्यांच्या प्रमुखांना सतावू लागली आहे.
कोरोना साथीच्या काळात अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:ची दिनचर्या ठरवून घेतली आहे. सामान्य स्थिती असताना ज्यांना कार्यालयाबाहेर जाऊन काम करावे लागायचे त्यांनीही घरातूनच काम कसे पूर्ण करता येईल याची आखणी केली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरच घरातून काम करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.