महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने शुक्रवारी (29 नोव्हेंबर 2024) निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यासंदर्भात काँग्रेसने व्यैयक्तिक सुनावणीची मागणीही केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, मतदान याद्यांमधून मतदारांना मनमानी पद्धतीने काढण्यात आले आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10,000 हून अधिक मतदार जोडले गेले. एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील मतदारांच्या डेटावर एका माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनीही प्रश्न उपस्थित केल्याचेही," काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटले आहे की, "मनमानी पद्दतीने हटविण्याच्या आणि जोडण्याच्या या प्रक्रियेत जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 47 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. 50 विधानसभा मतदारसंघांपैकी जेथे सरासरी 50,000 नवीन मतदार जोडले गेले, तेथे सत्ताधारी आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 47 जागा जिंकल्या आहेत."
मतदानाचा टक्का अचानक वाढल्यावर प्रश्नचिन्ह -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाने म्हटले आहे की, "21 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 58.22% होती, जी रात्री 11:30 पर्यंत 65.02% झाली. तसेच, अंतिम अहवालात 66.05% मतदानाची नोंद झाली." या पत्रानुसार, केवळ एका तासात म्हणजे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अंदाजे 76 लाख मतदान झाले आहे.
ईव्हीएमवरही आक्षेप - ईव्हीएमसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहे. "आम्हाला ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवे आहेत," असे खर्गे यांनी म्हटले आहे.