'जमावाचा हिंसाचार खपवून घेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:37 AM2018-07-20T03:37:17+5:302018-07-20T03:37:26+5:30
जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराचा आपण व केंद्र सरकार तीव्र निषेध करीत असून, अशा घटनांतील आरोपींविरोधात कडक कारवाई करावी, अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत. अफवा पसरविल्या जाऊ नयेत म्हणून सोशल मीडिया कंपन्यांनीही काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले.
स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये झालेली मारहाण, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना केलेले ट्रोलिंग आदी मुद्दे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उपस्थित केले होते. त्यावर निवेदन करताना राजनाथ सिंह म्हणाले की, जमावाच्या हिंसाचारात काही निरपराधांचे बळीही गेले आहेत. कायदा व सुव्यवस्था हा राज्यांचा विषय असला तरी स्थिती बिघडत असेल तर केंद्र सरकार गप्प बसणार नाही.
जयंत सिन्हा यांचा विरोधकांकडून निषेध
झारखंड येथील एका मांस विक्रेत्याला ठार मारणाºया सात आरोपींचा पुष्पहार घालून सत्कार करणाºया केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचा विरोधी सदस्यांनी जोरदार निषेध केला. विमानतळांच्या आधुनिकीकरणावर उत्तर देण्यासाठी सिन्हा उभे राहताच विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत जाऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. जयंत सिन्हा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करीत सिन्हा यांनी उत्तर देणे सुरूच ठेवले. नितीन गडकरी यांनी विरोधकांना आपापल्या जागेवर जाण्याची विनंती केली. अर्थात सिन्हा यांचे उत्तर संपताच विरोधक आपल्या जागी गेले. आरोपींचा सत्कार केल्याबद्दल सिन्हा यांनी याआधी दिलगिरी व्यक्त केली आहे.
>भाजपा सदस्यांकडूनच निषेध
लोकांचे बळी घेणे, चोप देणे हे नित्याचे प्रकार झाले असल्याचा आरोप करून वेणुगोपाल म्हणाले की, हे घडूनही केंद्र सरकार शांतच आहे. एका प्रकरणातील आरोपींचा तर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनीच सत्कार केला. याला कायद्याचे राज्य म्हणायचे का? ही स्थिती गंभीर असून लोकशाही वाचविण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलावीत. जमावाचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कायदा करायला हवा. त्यांचे भाषण सुरू असताना भाजपाचे काही सदस्य त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.