दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:22 AM2022-05-29T07:22:24+5:302022-05-29T08:04:53+5:30
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही.
नवी दिल्ली : अतिरेक्यांना समर्थन देणे बंद करा, अशा शब्दांत भारताने ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला (ओआयसी) फटकारले आहे. फुटीरवादी नेता यासीन मलिकला झालेली जन्मठेपेची शिक्षा देणे चुकीचे असल्याचे मत ओआयसीने व्यक्त केले होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ओआयसीने दहशतवादाला आता कोणत्याही प्रकारे योग्य ठरविण्याचा प्रयत्न करू नये. यासीन मलिकप्रकरणी भारतावर टीका करणे म्हणजे यासीन मलिकच्या दहशतवादी कारवायांचे समर्थन करण्यासारखे आहे. यासीन मलिकविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२५ मे रोजी यासीन मलिकला दोन प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ही शिक्षा एकाच वेळी भोगायची आहे. यासीन मलिकला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह अन्य गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. २०१६ मध्ये काश्मिरात हिंसक आंदोलन घडविल्याचा ठपका एनआयएने यासीन मलिकवर ठेवला होता. या प्रकरणी एनआयएने त्याच्या घरावर छापे घातले होते. त्यात काही महत्वाची कागदपत्रे सापडली होती.
काय म्हटले होते ओआयसीने?
ओआयसीने मलिक याच्या शिक्षेबाबत बोलताना म्हटले हाेते की, मलिकला अमानवीय पद्धतीने अटक करण्यात आली. काश्मिरातील अल्पसंख्याकांवरील छळ यातून दिसतो.