नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी पॉडकास्ट कार्यक्रम सुरू करणार असल्याची शक्यता आहे.
यासंदर्भात काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, "सध्या आम्ही योजना आखत आहोत आणि त्यावर कसे काम करता येईल. यावर चर्चा करीत आहोत. तसेच, आम्ही तज्ञांचा सल्ला घेत आहोत." याबाबतचे वृत्त हिंदी न्यूज १८ ने दिले आहे.
पॉडकास्ट एक ऑडिओ मेसेज किंवा डिस्कसन आहे. ज्याद्वारे डिजिटल माध्यमातून रिले किंवा प्रसारित केले जाऊ शकते. काँग्रेस नेत्याने सांगितले की, "एकदा यासंदर्भातील गोष्टी अंतिम होऊ द्या. त्यानंतर राहुल गांधी या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधानांच्या 'मन की बात'ला उत्तर देतील." तसेच, लिंक्डइनसह इतर प्लॅटफॉर्मवरही आम्ही विचार करत आहोत, असेही या काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपले यूट्यूब चॅनेल लॉन्च केले होते. मात्र, लॉकडाऊच्या काळात याचा जास्तकरून वापर करण्यास सुरुवात केली. या यूट्यूब चॅनेलचे आतापर्यंत 294,000 सब्सक्राइबर आहेत.
राहुल गांधी यांनी लॉकडाऊन दरम्यान मजुरांशी साधलेला संवाद 7,52,000 लोकांनी पाहिला आहे. तर आरोग्य तज्ज्ञ आशिष झा आणि कोरोनो व्हायरसबद्दल प्रोफेसर जोहान गिसेके यांच्याशी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ 90,000 लोकांपर्यंत पोहोचला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांचे ट्विटरवर 14.4 मिलियन आणि फेसबुकवर 3.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेत्याने असा दावा केला आहे की, कोरोनो विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 2 मे रोजी झालेले 'Speak Up India’ ऑनलाइन अभियान चांगले यशस्वी झाले. यामध्ये 5.7 मिलियनहून अधिक आपले मेसेज पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले.
दरम्यान, काँग्रेसच्या या योजनेवर मुंबईतील पॉडकास्टर अमित वर्मा यांनी सांगितले की, "नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. पॉडकास्टिंग हा संभाषण करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. मात्र, त्यावेळी राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूने संवाद साधावा. त्यांना लोकांशीच नव्हे तर लोकांशी बोलण्याचा मार्ग शोधावा लागेल."