कोलकाता: सोशल मीडियावर अनेकदा रेल्वे अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशा रेल्वे अपघातांमध्ये अनेकांचा जीव जातो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ पश्चिम बंगालमधून समोर आला आहे. व्हिडिओमध्ये धावत्या ट्रेनमधून उतरताना महिला पडल्याचे दिसत आहे. पण, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना पश्चिम बंगालमधील पुरुलिया रेल्वे स्टेशनवरची आहे. येथे तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने महिलेचा जीव वाचवून तिला नवजीवन दिले आहे. महिला चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान तोल बिघडल्याने महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत पडली.
फुटेजमध्ये संत्रागाछी-आनंद विहार एक्स्प्रेसने वेग वाढवताच दोन महिलांनी ट्रेनमधून उडी घेतल्याचे दिसत आहे. त्यापैकी एक प्लॅटफॉर्मवर सुखरूप उतरते, तर दुसरी महिला तिचा तोल गमावून ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत पडते. तेवढ्यात आरपीएफचे उपनिरीक्षक बबलू कुमार धावत येतात आणि महिलेला प्लॅटफॉर्मवर ओढतात. इतर अनेक लोकही महिलेच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत.
अधिकाऱ्यांनी वारंवार चालत्या गाड्यांमध्ये चढण्यास आणि उतरण्यास मनाई केली आहे. अनेकदा इशारे देऊनही प्रवासी जीव धोक्यात घालत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक प्रवासी प्लॅटफॉर्मवरुन चालत्या ट्रेनमध्ये चढताना दिसत आहे. या घटनेचे व्हिडिओ फुटेजही समोर आले असून, ते रेल्वेने ट्विट केले आहे.