शबरीमाला मंदिरात महिला; अफवेने परिसरात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:37 AM2018-10-21T04:37:38+5:302018-10-21T04:37:48+5:30
एक तरुण महिला आयप्पा मंदिराकडे निघाली असल्याचे वृत्त शबरीमाला परिसरात शनिवारी सकाळी पसरले आणि त्यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला.
केरळ : एक तरुण महिला आयप्पा मंदिराकडे निघाली असल्याचे वृत्त शबरीमाला परिसरात शनिवारी सकाळी पसरले आणि त्यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर भाविकांना प्रचंड गर्दी केली. त्या भागात जमावबंदी असूनही ती गर्दी वाढतच होती; पण ती महिला ५0 वर्षांवरील असल्याचे स्पष्ट होताच तणाव संपुष्टात आला.
तामिळनाडूतील एक महिला आपल्या कुटुंबीयांसह आयप्पा मंदिराकडे निघाली होती. तिला पाहून वयाचा अंदाज न आल्याने हा गोंधळ निर्माण झाला. शबरीमालाच्या आयप्पा मंदिरात १0 ते ५0 वर्षे वयाच्या मुली व महिलांना जाण्यास बंदी आहे. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवून मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत.
या मंदिराचे दरवाजे बुधवारी उघडल्यापासून तिथे रोज तणाव निर्माण होत आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरविले आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच मंदिर व्यवस्थापन यांनी मंदिरात वरील वयोगटातील महिलांना प्रवेश मिळू नये, अशी भूमिका घेतली आहे. मंदिर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून संपूर्ण परिसरात दीड हजारांहून अधिक पोलीस उभे आहेत. (वृत्तसंस्था)
> दाखवला जन्मदाखला
या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना भाविक निदर्शकांनी अडवले. त्यावर तिने आपले वय सांगितले आणि आपल्या जन्माचा दाखलाही त्यांच्यासमोर ठेवला. त्यातून तिचे वय ५0 हून अधिक असल्याचे लक्षात येताच, भाविकांनी तिला मंदिराकडे जाण्यास संमती दिली. शुक्रवारीही दोन तरुण महिला पोलीस संरक्षणात मंदिरापर्यंत गेल्या होत्या; पण मुख्य पुजाऱ्याने त्या आल्यास आपण मंदिराची दारे बंद करून निघून जाऊ , असा इशारा दिल्याने त्या माघारी परतल्या.